रायपूर - दंतेवाडा आणि बस्तर परिसरात नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी 'दंतेश्वरी लडाके' नावाचे महिला कमांडो पथक तैनात केले आहे. 30 महिला कमांडोचे हे पथक पुरुषांच्या खांद्याला खांदा देत नक्षलवादी परिसरात तैनात राहणार आहे. विशेष म्हणजे या पथकात १० आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी महिलांचाही समावेश आहे.
छत्तीगडमधील बस्तर परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यामुळे या परिसरात नक्षलवादी कारवाई रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यासाठी आता पोलीस दलाने नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी 'दंतेश्वरी लडाके' नावाचे खास महिलांचे पथक स्थापन केले आहे.
दंतेश्वरी लडाके या महिला कमांडो पथकात १० आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी महिलांचा समावेश आहे. दंतेवाडा येथे नक्षलवादी कारवायांवर या महिलांच्या कमांडो पथकामुळे आळा बसेल. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी महिला कमांडो पथक महत्वाची जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी व्यक्त केला.