अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आणि पायाभरणी केली. यावेळी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 175 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात 135 संत-महंत असून, उर्वरित 40 विशेष पाहुणे होते. सर्व जण एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. मंत्राच्या जयघोषात अनुष्ठान संपताच 'भारत माता की जय' आणि 'हर हर महादेव' या घोषणांनी परिसर दुमदुमला. मोदींच्या हस्ते मंदिराची पायाभरणी झाली. कार्यक्रमादरम्यान नऊ खडकांची पूजा करण्यात आली. मंदिराच्या पायाभरणीच्या मातीपासून मोदींनी त्यांच्या कपाळावर टिळक लावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत. दरम्यान, श्री रामजन्मभूमी मंदिरचा शिलान्यास करण्यापूर्वी पंतप्रधान हनुमानगढी मंदिरात प्रार्थनांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी प्रेमदास महाराज यांनी चांदीचा मुकुट भेट म्हणून दिला. त्यानंतर मोदींनी वृक्षारोपणही केलं.