नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या सहीने नवीन शेतीविषयक विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यापासून शेतकरी संघटना, राजकीय संघटना आणि विरोधकांनी भाजपा, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींनी मंगळवारी या कायद्याला विरोध करणारे शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे विरोधक संधीसाधूपणा करत असून ते केवळ विरोधाला विरोध करत असल्याचेही मोदी म्हणाले.
हेही वाचा - कर्तव्यासह आपली आवडही तेवढ्याच जोमाने जपणारा 'खाकी वर्दीतील शिल्पकार'
'नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि आरोग्याशी संबंधित अनेक सुधारणा आणल्या गेल्या. या सुधारणांमुळे मजूर, तरुण, महिला आणि देशातील शेतकरी बळकट होतील. पण काही लोक केवळ या सुधारणांना केवळ विरोधाला विरोध करून संधीसाधूपणा करत आहेत, हे देश पाहू शकेल,' असे मोदी म्हणाले.
'शेतकरी ज्या यंत्रांची पूजा करतात, त्या यंत्रांना आणि उपकरणांना आगी लावून हे लोक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी एमएसपी (किमान हमीभाव) लागू करण्याची आश्वासने दिली. मात्र, त्यांनी हे कधीच केले नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आमच्या सरकारने हे केले,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा - आसाममधील पूरस्थिती गंभीर; १३ जिल्ह्यातील तीन लाख लोकांना फटका!