पाटणा - बिहार बिधानसभेच्या निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानआज (बुधवार) होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या दोन सभा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी यापुर्वी देखील प्रचार सभेला संबोधित केले आहे. आता दुसऱ्यांदा ते प्रचार सभेला संबोधित करणार आहे.
याठिकाणी होणार सभा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात सभा घेणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम चंपारणमधील वाल्मीकीनगर आणि दरभंगामधील कुशेश्वरस्थानचा समावेश आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या प्रचार फेरीत बिहारमधील विकासकामांचा गुणगौरव केला होता. तर बेरोजगारी, उद्योग आणि शिक्षणाच्या संदर्भात राहुल गांधींनी सरकारवर तोफ डागली होती. पहिल्या प्रचार फेरीत दोघांनीही एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले होते. त्यामुळे दुसऱ्या प्रचार फेरीतील सभांमध्ये हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात -
बिहारमध्ये पहिल्या टप्प्पयातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये 1 हजार 66 उमेदवारांचे नशीब मशीनबंद होणार आहे. तर 14 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.