नवी दिल्ली - चीनसोबत सुरू असलेल्या गलवान व्हॅली येथील वादानंतर मोदींने केलेले वक्तव्य सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे, असे वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आज (शनिवार) पत्रकार परिषदेत म्हणाले. भारताच्या सीमेच्या आत कोणी घुसखोरी केली नाही, आणि कोणतीही चौकी ताब्यात घेतली नाही, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी काल सर्वपक्षीय बैठकीनंतर केले होते. त्याला आज काँग्रेसकडून उत्तर देण्यात आले.
मोदींनी केलेले वक्तव्य लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी याआधी केलेल्या वक्तव्याच्या विपरित आहे. जर मोदींनी केलेले वक्तव्य बरोबर असेल तर आम्हाला सरकारला काही प्रश्न विचारायचेत, जर चिनी सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर 5 आणि 6 मे रोजी सीमेवर वाद कसा झाला? असे चिदंबरम म्हणाले.
जर चिनी सैनिक भारताच्या भूमीत आले नाहीत तर 15-16 तारखेला सैनिकांमध्ये हाणामारी कोणत्या ठिकाणी झाली. आपले 20 सैनिक कोठे मारले गेले आणि 86 जण कसे जखमी झाले. जर कोणताही चिनी सैनिक भारताच्या भूमीत नाही, असे मोदी म्हणत असतील तर भारताचा भूप्रदेश कोणता हेही मोदींनी सांगावे, असे चिरंबरम म्हणाले.
गलवान व्हॅलीवर अधिकार असल्याचे चीन मागील काही दिवसांपासून सातत्याने म्हणत आहे. मोदीनीं जी बाजू मांडली ती धक्का देणारी आहे. चीनचा गलवान व्हॅलीचा दावा आपण नाकारणार आहोत की नाही? चीनचा दावा फेटाळून लावण्याची विनंती त्यांनी सरकारकडे केली. चीनचा दावा जर आपण नाकारला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे चिदंबरम म्हणाले.