नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 वाजता रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी सरकारने दुसऱया कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण केले आहे. तसेच शनिवारी सरकारने पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची नियमावली जारी केली. त्यामुळे मन की बातमधून पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी मोदींनी 18 मे पासून काही जनतेकडून काही सूचना आणि विषय मागवले होते. त्यातील काही विषयावर मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात चार लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. आज मोदी 'मन की बात' मध्ये 1 जूनपासून सुरू होणाऱ्या 'अनलॉक -1' बद्दल चर्चा करतील.
नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करतात. कार्यक्रमाची ही 65 वी आवृत्ती आहे. यापूर्वी लॉकडाऊनदरम्यान 29 मार्च आणि त्यानंतर 26 एप्रिल ला मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टाळेबंदी 30 जूनपर्यंत वाढविली आहे. देशभरात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कंटेन्टमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत.