नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी सकाळी देशवासियांशी संवाद साधला. मोदी आपल्या भाषणातून जनतेला कोरोनाच्या संसर्गाबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. कोरोनाचा धोका टळलेला नसून तो आजही तेवढाच घातक आहे, असे मोदी म्हणाले. कारगिल विजय दिवस, बिहार-आसामधील महापूर्, कोरोनाचे संकट, या बाबींवर मोदींनी भाष्य केले.
आज कारगिल विजय दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारगिल युद्धात आपल्या सैन्याने भारताच्या विजयाचा ध्वज फडकावला होता. भारताने मैत्रीचा हात पुढे केला असतानाही पाकिस्तानने पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या शूर सैन्याने पाकिस्तानला पराभूत केले. भारतीय सैन्याने गाजवलेला पराक्रम संपूर्ण जगाने पाहिला. तसेच युद्ध सुरू असताना वादग्रस्त वक्तव्ये करू नये, आपण जे बोलतो, त्याचा प्रभाव सैनिकांच्या मनोबलावर होते, असेही मोदी म्हणाले.
देशातील प्रत्येक नागरिकाने कोरोनाविरोधात लढा दिला आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. तसेच आपण आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे, असे मोदी म्हणाले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे. ही शस्त्रेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतात, असेही ते म्हणाले.
कोरोनाविरुद्ध लढा देणाऱया काही ग्रामपंचायतीचे मोदींनी कौतूक केले. तसेच त्यांनी महिलांच्या कार्याचाही उल्लेख केला. कोरोनाच्या काळात आपल्या देशातील युवकांनी, महिलांनी, आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर काही नवे प्रयोग सुरू केले आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी त्रिपुरा, मणिपूर आणि आसाममधल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचेही कौतूक कले. बांबूचा वापर करून या राज्यातील कारागीरांनी उच्च दर्जाच्या पाण्याच्या बाटल्या आणि डबे तयार करायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे. आपल्याला रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
बिहार, आसाम राज्यात पूराने थैमान घातले आहे. सर्व सरकारे, एनडीआरएफ ची पथके, राज्यांची आपत्ती नियंत्रण पथके, स्वयंसेवी संस्था सर्वच एकत्रितपणे पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. पुराच्या संकटाचा तडाखा बसलेल्या लोकांसोबत संपूर्ण देश उभा आहे, असे ते म्हणाले.
येत्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. टिळकांचे अवघे आयुष्य प्रेरक असून आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल. तसेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनी आपण या साथीच्या रोगापासून मुक्त होण्याचा, आत्मनिर्भरभारतचा, काही नवीन शिकण्याचा आणि शिकविण्याचा आण आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा संकल्प करू, असे शेवटी त्यांनी म्हटले.