नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज "परीक्षा पे चर्चा" या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम आयोजित करण्याची ही तिसरी वेळ होती. दिल्लीमधील तालकटोरा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, की एक पंतप्रधान म्हणून मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक वेगळा अनुभव मला मिळतो. मात्र, परीक्षा पे चर्चा हा माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ जाणारा कार्यक्रम आहे. 'विदाऊट फिल्टर' किंवा 'नो फिल्टर' ही आजकालची फॅशन आहे. त्यामुळेच, इथे आपल्यामध्ये कोणताही आडपडदा न ठेवता, हलकी-फुलकी चर्चा आपण करणार आहोत.
चांद्रयान- २ बाबत बोलताना ते म्हणाले, की मला काही लोकांनी सांगितले, की चांद्रयान-२ च्या लाँचवेळी मी गेले नाही पाहिजे, कारण कदाचित ते अयशस्वी होऊ शकते. मी म्हणालो, की त्यामुळेच मी तिथे गेले पाहिजे.
क्रिकेटचे दिले उदाहरण..
दृढनिश्चयाबाबत विद्यार्थ्यांना सांगताना, पंतप्रधानांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. २००१ ला झालेल्या सामन्यातील राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या विजयी भागीदारीचा त्यांनी उल्लेख केला. तसेच २००२ साली अनिल कुंबळे यांनी जखमी जबड्यासह खेळून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते, त्याचाही उल्लेख मोदींनी केला.
परीक्षेत चांगले गुण म्हणजे सर्वकाही नसतं..
आपल्याला लहानपणापासूुन असे सांगण्यात आले आहे, की परीक्षेत चांगले गुण मिळवणे अत्यावश्यक आहे. मात्र, केवळ तेवढे मिळवणेच सर्वकाही नसते. त्याव्यतिरिक्त इतर गोष्टींवरही आपण लक्ष दिले पाहिजे.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, त्यांनी एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटी बद्दलही चर्चा केली. ते म्हणाले की ही आजकालच्या पालकांसाठी फॅशन झाली आहे. आई वडिलांनी मुलांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यास नक्कीच प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र, त्या मुलाची आवड-निवड पाहून, त्या मुलाला कशात रस आहे ते पाहून, त्यानुसार हा निर्णय घ्यावा. एखादी अॅक्टिव्हिटी प्रसिद्ध आहे, किंवा फॅशनमध्ये आहे, म्हणून आपल्या मुलाच्या आवडीविरूद्ध त्याला ते करण्यास भाग पाडू नये.
तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नका..
आपण हे पाहतो एका कुटुंबातील चार लोक एकत्र बसले आहेत. मात्र आजकाल सर्वजण आपापल्या फोनमध्ये मग्न असतात. आपण या तंत्रज्ञानाशिवाय काही वेळ राहू शकतो? किंवा घरात अशी एखादी जागा तयार करू शकतो, जिथे तंत्रज्ञान वापरले जाणार नाही? जेणेकरून आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाकडे आपले मित्र म्हणून पाहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी आपण तंत्रज्ञानाचे गुलाम तर होत नाही ना, याबाबत जागरूक असायला हवे.
हेही वाचा : भारतीय लष्कर आणि राजकारण!