नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते मुख्यमंत्र्यांकडून आपापल्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यांच्या विलगीकरणाबाबत, आणि संशयितांच्या शोधाबाबत चर्चा झाली. तसेच, विस्थापित कामगारांचे आपापल्या राज्यांकडे जाणे, गरजेच्या वस्तूंची उपलब्धता आणि तबलीग जमात कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या लोकांचा शोध घेण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काही प्रमुख अधिकारीही उपस्थित आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. याआधी २० मार्चला त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर २४ मार्चला देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे १,९६५ रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ५० लोकांचा यात बळी गेला आहे.
हेही वाचा : COVID-19 : गेल्या चोवीस तासांमध्ये जगभरात पाऊण लाख नवे रुग्ण; तर पाच हजार जणांचा मृत्यू