फरीदाबाद - हरियाणा पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्पशूटर राहुल याला अटक केली आहे. तो जानेवारी महिन्यात मुंबई येथे अभिनेता सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आला होता. सलमान खान याने काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी नाराज झालेल्या बिश्नोईंच्या आदेशावरून त्याने हे काम केल्याचे सांगितले आहे. त्याच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. फरीदाबादच्या पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली.
फरीदाबाद जिल्हा गुन्हे शाखेने मंगळवारी केलेल्या या खुलाशाने खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खानची हत्या करण्यासाठी मुंबईत रेकी करणाऱ्या बदमाशांना अटक करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने त्याच्या राहुल नावाच्या गुंडाकडून सलमान खानची रेकी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपीने रेकी केल्याचे केले मान्य
आरोपी राहुलने जानेवारीमध्ये मुंबईत आल्याचे मान्य केले आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. तेथे तो तीन दिवस राहिला. यानंतर तो राजस्थानला परत आला. तेथे तो त्याच्या गँगचा म्होरक्या लॉरेन्स याला भेटला. मात्र, काही काळानंतर कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यामुळे आणि त्यांच्या कारवाया थांबल्या.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई ?
लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. सलमान खानने काळ्या हरणाची शिकार केली. यासाठी त्याला ठार मारणार असल्याचे लॉरेन्स याने म्हटले आहे. त्याने अनेकदा सोशल मीडिया पोस्टद्वारेही आपले मनसुबे व्यक्त केले आहेत. लॉरेन्स बिश्नोई याने 8 जानेवारी 2018 मध्ये एका खटल्याच्या सुनावणीदरम्यानही अशी धमकी दिली होती. तसेच, मागील दोन वर्षांत त्याने अशा कारवायाही केल्या आहेत. लॉरेन्स स्वतःच्या आणि त्याच्या गँगच्या प्रसिद्धीसाठी असे उपद्व्याप करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
राहुलपर्यंत असे पोहोचले पोलीस
फरीदाबादच्या एसजीएम नगरात 24 जून 2020 ला आशू नावाच्या एका युवकाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात यामागे राहुलचा हात असल्याचे समोर आले होते. तसेच, आशू पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय राहुलला आला होता, असेही पोलिसांना समजले होते. तपासात राहुल हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा गुंड असल्याचेही पोलिसांना समजले.
या प्रकरणी पोलिसांनी राहुलला पकडण्यासाठी सापळा रचून त्याला उत्तराखंडमधून अटक केली. पोलिसांनी राहुलसह आणखी चार आरोपींनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्यारेही ताब्यात घेण्यात आली आहेत. राहुलवर आतापर्यंत 4 हत्यांचे आणि लुटालुटीच्या अनेक प्रकारांचे खटले सुरू आहेत.