नवी दिल्ली : सात सप्टेंबरच्या रात्री भारत आणि चीनच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली होती. याबाबत देशाच्या लष्कराने अधिकृत माहिती जाहीर केली आहे. देशाचे जवान सीमेवरून मागे हटण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना, चीन वारंवार चिथावणी देण्याचे काम करत आहे. भारतीय लष्कर एकदाही चीनच्या सीमेमध्ये गेले नाही. तसेच, आपल्या बाजूने गोळीबारही झाला नसल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
सात सप्टेंबरला झालेल्या घटनेमध्ये चीनी सैन्याने भारतीय लष्कराला चिथावणी देण्यासाठी चीनने हवेत गोळीबार केला होता. चीन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, अशी माहिती लष्कराने जारी केलेल्या पत्रकामध्ये देण्यात आली आहे.
चीनच्या चिथावणीनंतरही भारतीय लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही. याउलट त्यांनी सीमेवरून मागे हटण्याची आपली प्रक्रिया सुरू ठेवल्याचे लष्कराने स्पष्ट केले. याचा अर्थ असा नक्कीच नाही, की देशाचे सैनिक दुबळे आहेत. मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वागायचे याची त्यांना चांगली जाण आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला धोका पोहोचवणारी एखादी घटना होत असेल, तर आपले जवान नक्कीच शांत बसणार नाहीत, असेही लष्कराने म्हटले आहे.
हेही वाचा : युनेस्कोच्या जागतिक वारशांमध्ये होणार सहा मुघलकालीन उद्यानांचा समावेश; प्रशासनाची तयारी सुरू