अहमदाबाद - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनापुढील निवडणूक शेजारच्या देशातून लढावी लागेल, असा टोला केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी लगावला आहे. 'आताच्या निवडणुकीत राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना या दोन्हीही ठिकाणांहून हार पत्करावी लागणार आहे,' असे गोयल यांनी म्हटले आहे.
'अमेठीमध्ये स्मृती इराणी राहुल यांना हरवतील. तसेच, ते वायनाडमधूनही हरतील. पुढच्या निवडणुकीला त्यांना शेजारच्या देशातून एखादी जागा शोधावी लागेल,' असेही गोयल यांनी म्हटले आहे. 'राहुल यांनी वायनाड येथून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या डाव्या सीपीआयच्या उमेदवारावर कधीच टीका केली नाही. त्यांच्यात तेवढी हिंमत आहे, असे दिसत नाही,' असेही ते म्हणाले.
'आपण राहुल गांधींचे सीताराम येचुरींसह अनेकदा फोटो पाहिले आहेत. त्यांना स्मृती इराणींकडून आपल्याला हार पत्करावी लागेल असे वाटले, त्याबरोबर ते वायनाडला पळाले. तिथे जाऊनही त्यांनी विरोधातल्या उमेदवाराविषयी एक शब्दही भाष्य केलेले नाही,' असेही गोयल यावेळी म्हणाले.