नवी दिल्ली - आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरब देशांमध्ये काम करत असलेला भारतीय कामगार वर्ग हा कोरोनाच्या दहशतीखाली अडकला आहे. त्यामुळे त्यांची मदत करण्यात यावी, असे या याचिकेमध्ये म्हटले आहे.
यासोबतच, या देशांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी, आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठीही तरतूद करण्यात यावी. तसेच तेथील कामगारांना -विशेषतः कोरोनामुळे ज्यांची नोकरी गेली आहे अशांना- आर्थिक सहाय्य देण्यात यावे. यासोबतच, त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्यासाठी तपासणी केंद्रही उपलब्ध करण्यात यावे, असेही या याचिकेत म्हटले आहे. प्रवासी लीगल सेलमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या देशांमध्ये त्या-त्या सरकारमार्फत सुरू करण्यात आलेले विलगीकरण कक्ष हे पूर्णपणे भरले असून, त्यांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. यासोबतच कित्येक देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भारतीयांवर उपचारही केले जात नसल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.
दरम्यान, याआधीही याचप्रकारची याचिका इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, सरकार सध्या करत असलेले काम हे समाधानकारक असल्याचे म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली होती.
हेही वाचा : कर्नाटक रेल्वेच्या २७० डब्यांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर