पाटणा - बिहारमध्ये मेंदूज्वराने मरणाऱ्या मुलांची संख्या रोज वाढत आहे. यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मंगल पांडे यांनी चालू बैठकीतच भारत-पाकिस्तान सामन्याचा स्कोअर विचारला. तर, यावेळी अश्विनी कुमार चौबे चक्क झोपी गेले होते.
बिहारमध्ये मुझफ्फरपूर जिल्ह्यात अॅक्युट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम (एईएस) या मेंदूज्वराने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना मंत्र्यांचे बेजाबदार वर्तन बघून संतापलेल्या लोकांनी ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत.
औरंगाबाद येथे हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि जन अधिकार पार्टी (लो) यांनी मंगल पांडे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने केली आहेत. आज याप्रकरणी हर्ष वर्धन आणि मंगल पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने याप्रकरणी २४ जूनला सुनावणी ठेवली आहे.