पणजी - कोरोना संसर्गावर औषध शोधून काढल्याचा दावा पतंजली कंपनीने नुकताच केला आहे. त्यांनी या औषधांची जाहिरातबाजीही सुरू केली आहे. मात्र, या औषधांचा सर्व तपशील आयूष मंत्रालयात जमा करण्याचे आदेश पतंजलीला देण्यात आले होते. त्यानुसार पतंजलीने यासंबधीचा अहवाल आयूष मंत्रालायकडे जमा केला आहे.
आयूष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी पतंजलीने औषधासंबंधीचा अहवाल जमा केल्याची माहिती दिली. मंत्रालयाद्वारे या अहवालाचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर या औषधाला परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. बाबा रामदेव यांनी नवे औषध शोधून काढले आहे. त्यांनी जे काही संशोधन केले असेल त्याला आयूष मंत्रालयाची परवानगी लागेल, असे नाईक म्हणाले.
पतंजलीने 'कोरोनील' आणि 'स्वासरी' ही दोन औषधे कोरोनावर काढली आहेत. क्लिनिकल चाचण्यांमध्ये 100 टक्के सकारात्मक निकाल आल्याचा दावा कंपनीने केला आहे. अत्यावश्यक रुग्ण सोडून इतर रुग्णांना हे औषध फायद्याचे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, आता या औषधाबाबतचा अहवाल आयूष मंत्रालयाने मागवला आहे. तोपर्यंत जाहीरात न करण्यासही पतंजलीला सांगण्यात आले आहे.