नवी दिल्ली - टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपी रेटिंगमध्ये अफरातफर होत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी नुकताच केला आहे. काही वाहिन्यांची नावेही समोर आली आहेत. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीकडून होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर संसदेच्या माहिती तंत्रज्ञान(आयटी) समितीचे प्रमुख असून हा विषय समिती चर्चेला घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
काँग्रेस खासदार कीर्ती चिदंबरम यांनी टीआरपी विषय चर्चेला घेण्याची मागणी थरुर यांच्याकडे केली होती. टीआरपीत फेरफार केल्याच्या प्रकरणावर संसदीय समिती गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एखादा कार्यक्रम प्रेक्षक किती वेळ पाहतात, कधी पाहतात यासंबधीची माहिती टीआरपीद्वारे मोजली जाते. त्यावरून एखाद्या कार्यक्रमाची प्रसिद्धी मोजण्यात येते. मात्र, यात घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात विशाल भंडारी (20), शिरीष शेट्टी (44), नारायण शर्मा (47), आणि बोंपेली राव मिस्त्री अशा चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या पोलीस चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. जवळपास 32 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या भारतातील वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्या यासंदर्भात आणखी मोठे खुलासे व्हायचे असल्याचे मुंबई पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने या चार आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची आता संसदीय समितीनेही दखल घेतली असल्याचे समोर येत आहे.
हंसा रिसर्च ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विशाल भंडारी या आरोपीची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये पाच व्यक्तींच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावल्याचे सांगितल. हे बॅरोमीटर लावत असताना त्याने एका विशिष्ट वाहिनीला दिवसभरात दोन तास चालू ठेवण्यास सांगितले. यासाठी विशाल भंडारी हा संबंधित लोकांना दर महिन्याला 400 रुपये देत होता, अशी माहिती पुढे आली आहे.