चंदीगड - पंजाब पोलिसांनी शुक्रवारी खलिस्तानी चळवळीशी संबधीत दोन हस्तकांना अटक केली आहे. या दोघांचे पाकिस्तानातील गुप्तचर संघटनेशी संबध असल्याचेही तपासात समोर आले आहे. राज्यामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आणि काही ठराविक व्यक्तींना मारण्याचा कट पाकिस्तानच्या सांगण्यावरून आखण्यात येत होता. पोलिसांनी या कारवायांना ‘पाकिस्तान लिंकड् टेरर मॉड्यूल’ असे म्हटले आहे.
गुरमीत सिंग आणि विक्रम सिंग या दोघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आल्याचे पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जी. टी रोडवरील गुरुदासपुरीया ढाबा येथून दोघांना अटक केली. हा परिसर जांधियाला पोलीस ठाण्यांतर्गत येतो.
जर्मन बनावटीची एमपी 5 मशिन गन, चार मॅक्झिनसह 9 एमएम पिस्तुल आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. फोनमध्ये अनेक संभाषणे, फोटो आणि संदेश पोलिसांना आढळून आले आहेत. या फोनद्वारे पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांशी दोघांचा संपर्क होत असल्याचे उघड झाले आहे. फोनमधील जिओ लोकेशनही पाकिस्तानातील आहेत.
यातील गुरमीत सिंग हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या कायम संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. विविध कलमांखाली दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुरमित सिंग(44) हा अमृतसर येथील सुलतान विंड रोडवरील गंदा सिंग कॉलीनी येथे राहणार आहे. पाकिस्तानी हस्तकांनी भारतात ठेवलेली शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासंबधी अनेक संदेश आणि छायाचित्रे गुरमित यांच्याजवळील मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. कोठे आणि कोणावर हल्ला करायचा याची माहिती त्यांना पाकिस्तानातून देण्यात येत असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.