इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शहरात हिंदू मंदिर बांधण्यास काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान सरकारने परवानगी दिली होती. मात्र, हिंदू मंदिराच्या बांधकामास अनेक धार्मिक कट्टरतावाद्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात अनेक याचिकाही न्यायालयात आल्या आहेत. आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मंदिर बांधकामाचा निकाल राखून ठेवला आहे.
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती. त्यास परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, बांधकामाच्या विरोधात याचिका आल्याने मंदिर निर्माण खोळंबले आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक- ए- इन्साफ पक्षाबरोबर आघाडी केलेल्या पाकिस्तान मुस्लिम लिग(कैद) पक्षाने इस्लामाबादेत हिंदूंसाठी श्री कृष्णा मंदिर बांधण्यास विरोध केला आहे. हा प्रकल्प इस्लामच्या विरुद्ध असल्याचे म्हणत रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
मंदिरास विरोध होत असल्याने राजधानी विकास प्राधिकरणाने मंदिराच्या संरक्षक भींतीचे बांधकाम थांबविले आहे. कायदेशीर अडचणींचे कारण देत प्रशासनाने काम थांबविले आहे. सरकारने हे प्रकरण कौन्सिल ऑफ इस्लाम आयडिऑलॉजीकडे पाठविले आहे. आमिर फारुक यांनी या प्रकरणाची सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली.
भव्य श्री कृष्णा मंदिर इस्लामाबादेत उभे राहणार?
शहरातील एच -9 प्रभागात तब्बल 20 हजार स्केअर फुटची जागा मंदिरासाठी प्रस्तावित आहे. या जागेचे भूमीपूजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पाकिस्तानी संसदेच्या मानवी हक्क समितीचे सचिव लाल चंद उपस्थित होते. मंदिराचा सबंध आराखडा आणि नियोजन शहर विकास प्राधिकरणाकडे अजूनही जमा करण्यात आले नाही. त्यामुळे काम थांबविण्यात आल्याचे प्राधिकरणाने सांगितले. 2018 साली ही जागा हिंदू पंचायतीला देण्यात आली होती. मात्र, आता मंदिराला विरोध होत असल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.