नवी दिल्ली - कोरोनाकाळात केंद्र सरकारकडून 11 मार्चपासून 3.04 कोटी एन-95 मास्क, 1.28 कोटींहून अधिक पीपीई किट व 10.83 कोटी एचसीक्यू गोळ्यांचे मोफत वाटप देशातील विविध राज्यात कण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी (13 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 22 हजार 533 'मेक इन इंडिया' व्हेंटिलेटरही विविध राज्यांना देण्यात आल्यचेही म्हटले आहे. कोरोनाकाळात विविध वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच केंद्र सरकारने विविध राज्यांना अनेक वैद्यकीय उपकरणे दिल्याचे केंद्रीय मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात भारतात समाधानकारक उपकणे किंवा साहित्य उपलब्ध नव्हती. त्यामुळे ती विदेशातून आयात करावी लागली. त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वस्त्रोद्योग व औषध निर्मिती मंत्रालय, उद्योग व अंतर्गत व्यापार विभाग (डीपीआयआयटी), संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि विविध उद्योग व संघटनांच्या एकत्रित प्रयत्नाने कोरोनाकाळात लागणारे उपकरणे देशातच तयार करण्यात आली. जसे की, पीपीई किट्स, एन -95 मास्क, व्हेंटिलेटर इत्यादी उपकरणे देशातच तयार करण्यात आल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळत असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.