नवी दिल्ली : शेतकरी विधेयकांबाबत विरोधी पक्षनेते आज सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यासाठी केवळ पाच नेत्यांनाच राष्ट्रपतींची भेट घेता येणार आहे.
विरोधकांच्या गदारोळात सोमवारी आवाजी मतदान घेत दोन शेतकरी विधेयके मंजूर करण्यात आली होती. यावेळी उपसभापतींशी गैरवर्तन केल्यामुळे आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले होते.
मंगळवारी काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेच्या भाषणानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी सभात्याग केला होता. त्यानंतर आज गुलाम नबी आझाद यांच्या कार्यालयात विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
ज्याप्रकारे राज्यसभेमध्ये कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. सभापतींनी विरोधकांना चर्चेसाठी वेळ न देता, घाईघाईत दोन्ही विधेयके मंजूर करून घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत. विरोधकांनी याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रपतींसोबत बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज ही बैठक होणार आहे.
हेही वाचा : 'उपसभापतींचे चुकलेच', शरद पवारांचे मत; निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ करणार लाक्षणिक अन्नत्याग