भोपाळ - पुन्हा एकदा सणासुदीच्या मोसमात कांद्याच्या वाढत्या किमतीने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं. सध्या देशभरात काद्यांचे दर वाढले असतानाच मध्य प्रदेशमध्येही शंभर रुपये किलोपर्यंत कांद्याच्या किमती गेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त मान्सून झाला. तसेच परतीचा मान्सूनही मोठ्या प्रमाणात बरसला. यामुळे कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले.

अतिवृष्टी आणि पुराचा फटका
यंदा भारतातील मान्सून लांबल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातच परतीच्या मान्सूनवेळी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र या राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काढणीला आलेल्या कांद्याचा पिकाला फटका बसला. यामुळे आवक घटली आणि कांद्याचे दर वाढले. कांद्याचे प्रमुख उत्पादन निघणाऱ्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. यामुळे स्थानिक कृषी उत्पन्नबाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर वाढले. याचा थेट परिणार किरकोळ मार्केटवर होऊन ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. दसऱ्यापर्यंत कांद्याची आवक वाढून दिवाळीपर्यंत दर उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

साठवणुकीमुळे किरकोळ बाजारात किमती वाढल्या
काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी कांदा आणि बटाट्याची साठवण केल्याने देखील किमती वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यात काही ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र अद्याप अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केल्याने दर वाढले आहेत. केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्यासह अनेक गोष्टींच्या साठवणुकीवर बंधने काढली आहेत. त्याचा फटका किमतीतील चढ-उतारावर होत आहे. जबलपूर येथील कांद्याच्या बाजारात व्यापाऱ्यांकडे 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे कांदा मिळत आहे. मात्र पुरवठा साखळीतील कमिशन एजंट्समुळे ग्राहकांपर्यंत 90 रुपये किलोपर्यंत तो पोहोचतो.

यंदा नाशकातून काद्यांची आवक
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मोठ्या प्रमाणाच कांद्याचे उत्पन्न निघते. यामध्ये नजीकच्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. नरसिंगपूर आणि सागर परिसरात पावसामुळे कांद्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे यंदा खांडवा ते जबलपूर अशी कांद्यांची आवक झाली आहे. मात्र, यंदा खरिपाच्या हंगामात नाशिकहून कांद्याची आवक करण्यात आाली आहे. मात्र, महाराष्ट्रातही उत्पादन कमी झाल्याने आवक घटली आहे.