लखनऊ - उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. शामली जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण तबलीगी जमातच्या काही लोकांच्या संपर्कात आला होता. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे १८ रुग्ण समोर आले आहेत. यातील १७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नव्याने आढळलेला हा रुग्ण तैमूरशाह परिसरात राहणारा आहे. मेरठ वैद्यकीय महाविद्यालयाकडून तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळताच त्याला रुग्णालयात दाखल केले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनाही क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे.
शामली जिल्ह्यातील बहुतांशी कोरोनाबाधित तबलीगी जमातशी संबधित आहेत. आत्तापर्यंत आढळलेल्या १८ रुग्णांपैकी १७ रुग्णांचा संपर्क तबलीगींशी आला आहे.
शामली जिल्ह्यातील ६५ वैद्यकीय अहवाल शुक्रवारी मेरठ वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाले. यातील ६४ अहवाल निगेटिव्ह आणि १ अहवाल पॉझिटिव्ह आला. ३४ वैद्यकीय अहवाल अद्याप मिळणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी दिली.