तुम्ही 'नाईन्टीज किड' म्हणजे नव्वदच्या दशकात जन्मलेले असाल, तर लहानपणी तुम्ही नक्कीच दूरदर्शन पाहिले आहे. पूर्वीच्या काळी आताप्रमाणे विविध चॅनल्सचा भडिमार नव्हता. त्यामुळे मनोरंजनासाठी टीव्हीवर केवळ एकच चॅनल होते, ते म्हणजे 'दूरदर्शन'. आज विविध चॅनल्सच्या गर्दीत हरवलेले दूरदर्शन हे काही दिवसांपूर्वी रामायणाच्या पुन्हःप्रक्षेपणामुळे चर्चेत आले होते. मात्र या दूरदर्शनचा प्रवास कधी सुरू झाला याबाबत तुम्हाला माहितीये..?
दूरदर्शनवरून पहिले प्रसारण हे १५ सप्टेंबर १९५९ला नवी दिल्लीमधील आकाशवाणीच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या स्टुडिओमधून करण्यात आले होते. मात्र दूरदर्शनला खरी रंगत १९८२नंतर आली, जेव्हा दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण सुरू करण्यात आले, आणि घराघरांमध्ये रंगीत टीव्ही पोहोचण्यास सुरुवात झाली होती.
दूरदर्शनचे बोधचिन्ह..
मानवी डोळ्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे दुरदर्शनचे बोधचिन्ह 1970 मध्ये देवशीष भट्टाचार्य यांनी तयार केले होते. तेव्हा यासाठी आलेल्या अनेक बोधचिन्हांमधून देवशीष यांच्या बोधचिन्हाची निवड तक्तालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतः केली होती.
दूरदर्शनचा प्रवास..
- 1959 मध्ये दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर आधारित एक तासाचा हा कार्यक्रम होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. हा एक पायलट प्रोजेक्ट होता.
- 1965 मध्ये ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून दूरदर्शनवर नियमित दैनिक प्रसारणांची सुरुवात करण्यात आली. दिवसाला सुमारे चार तासांचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येत होते. पाच मिनिटांच्या बातमीपत्राने याची सुरुवात होत.
- 1975 मध्ये भारतातील फक्त 7 शहरांमध्ये टीव्ही सेवा पोहचली होती. यामध्ये अमृतसर आणि मुंबईचाही समावेश होता.
- 1976 रोजी दूरदर्शन ऑल इंडिया रेडिओपासून विभक्त करण्यात आले.
- 1982 मध्ये दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण सुरू झाले. याच वर्षी देशात रंगीत दूरचित्रवाणीही पोहोचली होती.
- 1984 मध्ये डीडी नेटवर्कने डीडी 2 नावाने आणखी एक चॅनल सुरू केले. (आता याचे नाव डीडी मेट्रो आहे.)
- 1991ला देशात केबल टीव्ही आणि खासगी चॅनल्सचे आगमन झाले. यामुळे दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग कमी होण्यास सुरुवात झाली.
- 2004 मध्ये दूरदर्शनने डीडी फ्री डिश ही मोफत डीटीएच सेवा सुरू केली. ही देशातील एकमेव मोफत डीटीएच सेवा आहे.
- 2016 मध्ये इन्सॅट-4 बी ऐवजी जीसॅट-15 या उपग्रहाद्वारे प्रक्षेपण सुरू केल्यामुळे डीडी फ्री डिशवर आणखी मोफत चॅनल उपलब्ध झाले.
प्रेक्षकांच्या मनात घर केलेले काही विशेष कार्यक्रम..
- 1967 : देशातील शेतकऱ्यांसाठी म्हणून सुरू करण्यात आलेला विशेष कार्यक्रम कृषी दर्शन हा यावर्षी स्वातंत्र्यदिनाला प्रसारित झाला. हा देशातील सर्वाधिक काळ सुरू असलेला कार्यक्रम आहे.
- 1976 : यापूर्वी केवळ माहितीपर कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या दूरदर्शनवर पहिली मनोरंजक मालिका 'लड्डू सिंग टॅक्सिवाला' प्रसारित करण्यात आली.
- 1982 : चित्रहार हा लोकप्रिय कार्यक्रम सुरू झाला. याच्या सहा वर्षांनंतर रंगोली हा आणखी एक असाच कार्यक्रम सुरू करण्यात आला.
- 1984 : देशातील पहिली दैनंदिन मनोरंजक मालिका 'हम लोग' सुरू झाली. 154 भागांची ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली.
- 1987-1990 : रामानंद सागर यांची रामायण (1987-88), आणि बी. आर. चोप्रा यांची महाभारत (1988-90) या दोन मालिकांना भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे, तीस वर्षांहून अधिक काळानंतर, 2020मध्ये जेव्हा रामायणचे पुनःप्रक्षेपण करण्यात आले, तेव्हाही या मालिकेला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळाला.
- 1994 : फँटसी फिक्शन प्रकारातील मालिका चंद्रकांताचे प्रक्षेपण सुरू झाले. दर रविवारी ही मालिका प्रसारित होत.
- 1997 : भारतीय टेलिव्हिजनवरील पहिला सुपरहीरो, शक्तिमान मालिका सुरू झाली. विशेष म्हणजे, लहान मुलांसह मोठ्या लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता.
हे माहीत आहे का..?
- प्रतिमा पुरी : दूरदर्शनवर पाच मिनिटांचे बातमीपत्र सांगण्यास सुरुवात झाल्यानंतर, 'प्रतिमा पुरी' या देशातील पहिल्या वृत्तनिवेदिका झाल्या.
- शाहरूख खान : जगप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा थिएटरच्या आधी छोट्या पडद्यावर झळकला होता. दूरदर्शनवर प्रसारित झालेली फौजी ही त्याची पहिली मालिका.
- केरन लुनेल : लिरील या साबणाची जाहिरात ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिलीच जाहिरात होती. 1985मध्ये प्रसारित झालेल्या या जाहिरातीमधील मॉडेल ही केरन लुनेल.
- आकाशवाणीच्या तात्पुरत्या स्टुडिओमध्ये सुरू झालेल्या दूरदर्शनचे आज देशभरात 66 स्टुडिओ आहेत.