जयपूर (ओडीशा) - लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्याने जयपूरच्या ओडीशा येथे राहणाऱ्या एका तरुणाने महाराष्ट्रातून जयपूरपर्यंत सायकलने प्रवास पूर्ण केला आहे. महेश जेना असे या युवकाचे नाव आहे. त्याने तब्बल १७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपले मुळ गाव गाठले आहे. त्याला काही काळासाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. क्वारंटाईन काळ पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी सोडण्यात आले आहे.
याबाबत त्याने सांगितले, की 'मी महाराष्ट्रातील एका कंपनीमध्ये कर्मचारी आहे. तिथे मी दरमहा ८००० रुपये कमावतो. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मला माझा पगार मिळाला नाही. तसेच, माझ्याकडे अन्नधान्यही कमी होते. त्यामुळे मी माझे मुळ गाव ओडीशा गाठण्याचा निर्णय घेतला'.
आपल्या प्रवासाबाबत त्याने पुढे सांगितले, की 'मी १ एप्रिलला माझ्या सांगलीच्या एका मित्राकडून ३००० हजार रुपये उसने घेतले होते. माझ्या या प्रवासात मला काही दिवस जेवण मिळाले नाही. हैदराबाद येथे माझी सायकल पंक्चर झाली होती. त्यानंतर बरेच अडथळे पार करत मी ७ एप्रिलला जयपूरला पोहचलो. येथे पोहचल्यानंतर मी जयपूर सीमेवरील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाईनमध्ये राहिलो'.
या काळात सायकलने बरीच साथ दिल्याचे या तरुणाने सांगितले. 'दिवसातून १४ ते १५ तास प्रवास पूर्ण करुन हा प्रवास पूर्ण केला. रात्रीच्या वेळी मी मंदिरात झोपत असे. जेव्हा पोलीस मला अडवत असत तेव्हा मी त्यांना महाराष्ट्रातून सायकलवर प्रवास करत असल्याचे सांगत होतो. मला ओडिशाला जायचे आहे, असेही त्यांना सांगत होतो. मात्र, त्यांना तो विनोद वाटला असे. ते मला पुढे जाण्यासाठी सोडत असत', असेही तो म्हणाला.