भुवनेश्वर - कोरोनाविरोधातील लढाई स्वत: चा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा आगाऊ पगार देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. देशरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण 500च्या पुढे गेले आहेत. या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका आहे. अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा आगाऊ पगार देऊन खूष करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचारी सामाजिक अवहेलनेलाही सामोरे जात आहेत. सोसायट्या आणि घरमालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकल्याच्या घटनाही दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडूतून समोर आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल, असे रहिवाशांना वाटत आहे, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोसायट्या सोडण्याची धमकी काही घरमालक देत आहेत. हे खूपच चिंताजनक असल्याचे काल (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ओडिशा सरकारने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे.
ओडिशामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तरीही राज्याने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त 116 रुग्ण आढळून आले आहेत, तर केरळमध्ये 109 रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात 562 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जण पूर्णत: बरे झाले आहेत. देशभरात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने देशामध्ये 21 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या 21 दिवसांमध्ये सर्व नागरिकांनी घरामध्ये राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच देशातील 80 कोटी नागरिकांना स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.