वॉशिंग्टन / मुंबई: ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड असलेल्या पाच भारतीय-अमेरिकन जोडप्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चुकीचे वर्तन केल्याचे या कुटुंबीयांनी म्हटले आहे. भारतीय वंदे भारत मिशनमार्फत ही पाच जोडपी सोमवारी मुंबई विमानतळावर दाखल झाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने वंदे भारत मिशन सुरु केले आहे. ओव्हरसिज सिटीझन्स ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड असलेल्या काही नागरिकांना कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध असतानाही भारतात परतण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ओसीआय कार्ड भारतीय वंशाच्या लोकांना दिले जाते. यातील बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना व्हिसा-रहित प्रवासाची परवानगी दिली जाते.
या ओसीआय कार्डधारकांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर असा खुलासा केला आहे, की न्यूयॉर्कहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्यासोबत काही अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले. त्यांना मुंबई विमानतळावर तब्बल सात तास या अधिकाऱ्यांनी थांबवून ठेवले.
एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले, की त्यांना देशात येण्याची परवानगी नाही. सोबतच अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासास कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले, असा आरोप या कुटुंबातील एका सदस्याने केला. सोबतच या सात तासांमध्ये त्यांना अन्न किंवा पाणी घेण्यासही परवानगी दिली गेली नाही.
यावर प्रतिक्रिया देताना जयपूरमधील यूएसएचे अध्यक्ष असलेले न्यूयॉर्क येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेम भंडारी म्हणाले, ओसीआय कार्डधारकांसोबत भारतीय अधिकाऱ्यांकडून केले जाणारे हे वर्तन धक्कादायक आहे. अमेरिकेतील या ओसीआय कार्डधारकांच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर भंडारी म्हणाले की, लवकरच नागरी उड्डाण सचिवांसह मुंबई आणि नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचवणार आहे. सोबतच अमेरिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या नॉन इंडियन मुलांबरोबर भारतात प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती त्यांनी भारत सरकारला केली.