हैदराबाद - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आले आहे. या एन्काऊंटर नंतर शहरात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे. सध्या सोशल माध्यमांवर जय पोलीस, सज्जनार हा हॅशटॅग ट्रेंड करत असून सायबर पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांचे कौतूक केले जात आहे. सज्जनार हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात.
व्ही. सी. सज्जनार भारतीय पोलीस सेवेतील 1996 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सज्जनार हे सध्या सायबरबादचे पोलिस आयुक्त आहेत. दिशा सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरण त्याच्या अखत्यारीत आहे.
2008 मध्ये सज्जनार हे तेलंगणामधील वारंगल येथे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी अॅसीड हल्ला प्रकरणातील तीन आरोपींना गोळ्या घालून ठार केले होते. वारंगलमधील मन्नूरजवळ हे एन्काऊंटर करण्यात आले होते. श्रीनिवास, हरिकृष्ण आणि संजय अशी अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. काकातिया इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी येथील विद्यार्थींनीवर आरोपींनी अॅसीड हल्ला केला होता.
2016 मध्ये नक्षलवादी नईम याला चकमकीत ठार मारण्यात सज्जनर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.