भोपाळ(मंडला) - मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये एका २८ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत तरुण हा नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) चा स्थानिक पदाधिकारी होता.
शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मयूर हॅपी यादव (वय 30) याला ताब्यात घेतले आहे. हत्या झाली तेव्हा मृत सोनू पारोचिया हा काकांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) विक्रमसिंह कुशवाह यांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार पारोचियाच्या दुचाकीला यादवच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर आरोपीने पारोचियावर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, असेही कुशवाह म्हणाले. ही घटना घडली तेव्हा पारोचियासोबत त्याचे दोन मित्रही होते.
मृत सोनू पारोचिया हा मंडला जिल्हा युनिटचा सरचिटणीस होता, अशी माहिती एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अखिलेश ठाकूर यांनी दिली. आरोपी यादव हा मूळचा जबलपूर येथील असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो मंडला येथे राहत आहे. त्याच्याविरूद्ध अनेकवेळा पोलिसांत तक्रार केली आहे, असेही ते म्हणाले.