इंफाळ - मणिपूर येथील भाजप सरकारचा एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) पक्षाने पाठिंबा काढला आहे. एनपीएफ पक्षाचे प्रवक्ते अचुम्बेमो कीकॉन यांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याची माहिती माध्यमांना दिली.
कोहिमा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक घेण्यात आली. खूप वेळ चाललेल्या या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढत असल्याचा निर्णय घेतला. एनपीएफ पक्षाच्या सूचना तसेच कल्पनांचा भाजप विचार करत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कीकॉन यांनी सांगितले.
मणिपूर विधानसभेत एकूण ६० सदस्य आहेत. काँग्रेसने २८ जागा जिंकल्या मात्र त्यातील आठ आमदारांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे भाजपचे एकूण संख्याबळ २१ वरुन २९ झाले. त्यानंतर भाजपने नागा पीपल्स फ्रंट यांच्यासह इतर तीन आमदारांचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आज नागा पीपल्स फ्रंटने आपल्या चार आमदारांचा पाठिंबा काढला आहे. तर नॅशनल पिपल्स पार्टीचे चार आमदार आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री ए. बिरेन सिंह याबाबत म्हणाले की, आम्ही सध्या निवडणूकीच्या मूडमध्ये आहोत. निवडणुकीसाठी मी सध्या दिल्लीमध्ये आहे. सध्या याविषयी काही बोलू शकत नाही.