नवी दिल्ली - कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारित अॅप विकसित केले आहे. सध्या केंद्र सरकार सगळ्यांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचे आवाहन करत आहे. गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल. वाय यांनीही लोकांना आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील 36 कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱया लोकांना आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू अॅप सर्वोत्कृष्ट आहे. ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सुहास एल. वाय यांनी केले.
दरम्यान आरोग्य सेतु अॅप डाउनलोड न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांचेही त्यांनी खंडन केले. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड न केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सेतू हे अॅप सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेला भाग म्हणजे कंन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हे अॅप वापरावे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
आरोग्य सेतू अॅप तुम्हाला कोरोनाचा धोका किती आहे, हे सांगते. तसेच तुमच्या परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण किंवा संभाव्य रुग्ण किती आहेत. याची माहिती देते. मोबाईलच्या ब्ल्यूटुथद्वारे हे अॅप काम करते. देशामध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ४ मे पासून पुन्हा २ आठवड्यांसाठी संचारबंदी वाढविण्यात आली आहे.