चंदीगड : कोरोना विषाणूमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. जगातील सर्वच स्तरांवर, सर्व क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे याचा परिणाम झाला आहे, तो म्हणजे शिक्षण क्षेत्रावर. हरियाणाही याला अपवाद नाही. राज्य सरकारचा दावा आहे, की ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे. मात्र, राज्याच्या ग्रामीण भागामध्ये, जिथे मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नसते, तिथली परिस्थिती पाहता सरकारच्या या दाव्यातील फोलपणा सहज लक्षात येतो. नूह जिह्यात, जिथे अगोदरपासूनच शिक्षणाची दुरावस्था आहे, तिथे कोरोनामुळे परिस्थिती आणखीच बिघडली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. एज्युसॅट, केबल आणि व्हॉट्सअॅपच्या मदतीने ते मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करत आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ६१ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण पोहोचले आहे.
मात्र, ईटीव्ही भारतने जेव्हा जिल्ह्यामध्ये जाऊन खऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा प्रशासनाच्या दाव्यामधील फोलपणा उघडकीस आला. हा जिल्हा ग्रामीण भाग आहे, येथील लोकांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे टीव्ही किंवा अँड्रॉईड फोन हे सर्वांच्या घरात उपलब्ध असतील असे नाही. येथील कित्येक घरांमध्ये तर साधे फोनही नाहीत.
जर कोणाकडे फोन असेलही, तरीही त्यांना ऑनलाईन व्हिडिओ पाहता येतील असा इंटरनेट पॅक मारण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. आणि या सर्व गोष्टींवर मात करत कोणी रिचार्ज केलाच; तर फोनला वारंवार चार्ज करण्यासाठी गावात तेवढी वीजही उपलब्ध नसते.
शहरातील मुलांसाठी सहज उपलब्ध असलेले हे ऑनलाईन शिक्षण, ग्रामीण भागातील मुलांसाठी अजूनही स्वप्नच आहे.