तिरुवअनंतपुरम : भारत आणि चीनचा सीमावाद हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या सीमेवर असणाऱ्या भागामध्ये या वादामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्यामध्ये, केरळमध्ये असणाऱ्या एका चीनी गावामध्ये मात्र शांततेचे वातावरण दिसून येत आहे. ही टायपिंग मिस्टेक नाही! केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यामधील एका गावाचे नाव 'चायना जंक्शन' आहे.
१९५०मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना या गावामध्ये तिरंग्यांपेक्षाही कम्युनिस्ट ध्वजांचे प्रमाण अधिक दिसून आले. याचा अर्थ असा नाही, की केरळमधील लोकांना देशाप्रती आदर नव्हता. तर कम्युनिस्ट नेते इ.एम.एस नंबुद्रीपाद यांच्या लोकप्रियतेची ती निशाणी होती. हे पाहिल्यामुळे नेहरूंनी या भागाचे नाव चायना जंक्शन ठेवले.
मात्र हे चायना जंक्शन आणि चीनचा काहीही संबंध नाही. उलट, या भागामधील काही लोकांनी गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेचा निषेध म्हणून चीनचा राष्ट्रध्वजही जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच, या भागातील लोक हे स्वतः चीनी वस्तूंचा वापर टाळून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा प्रसार करत आहेत.
हेही वाचा : भारताच्या हद्दीत नेपाळच्या लष्कराकडून हेलिकॉप्टर तळाची उभारणी