नवी दिल्ली - आज दसऱ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी आज संध्याकाळी रावणाचे पुतळे जाळून दसरा साजरा करण्यात येईल. दिल्लीतील लाल किल्ल्यावर देखील दसऱ्यानिमित्त राम, कुंभकर्ण आणि मेघनादचे पुतळे जाळण्यात येतील. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार नाही.
हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. फटाक्यांच्या आवाजात रावण दहन करण्याची लोकांना सवय झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी रावण दहनाच्या वेळी ध्वनीक्षेपकावर फटाक्यांचे आवाज ऐकवण्यात येणार असल्याची माहिती 'लव कुश रामलीला' मंडळाचे आयोजक, अर्जुन कुमार यांनी दिली. तसेच, यावर्षी रावणाच्या पुतळ्याची उंचीदेखील १२५ फुटांवरून ६० फुटांवर आणली असल्याचे त्यांनी सांगितले.
कुमार यांच्या मते दरवर्षी दसऱ्याला साधारणपणे १५ ते २० हजार फटाक्यांच्या माळा वापरल्या जातात. यावर्षी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच हवा प्रदूषण कमी होईल, अशी आशा आहे. लव कुश रामलीला मंडळ हे दिल्लीमधील सर्वात जुन्या रामलीला मंडळांपैकी एक आहे. दहा दिवस चालणाऱ्या 'रामलीला' नाटकामध्ये विविध राजकारणी तसेच चित्रपट अभिनेत्यांचा समावेश करण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे.
हेही वाचा : भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम...