नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा सामुदायिक प्रसार झाला नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे. तर देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा बरे होण्याचा दर 49.21 टक्के झाला असून, कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल पत्रकार परिषदेत म्हणाले.
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2 लाख 65 हजार 79 इतकी झाली आहे. याव्यतिरिक्त एकाच दिवसात 5 हजार 823 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. 83 जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लॉकडाऊन यशस्वी झाल्याचे दिसून आल्याचे अगरवाल म्हणाले.
अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदरही कमी आहे. मात्र, तरीही मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या बरीच कमी झाली आहे. देशातील 24 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते असे, अगरवाल यांनी सांगितले.
दरम्यान, इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, भारत मोठा देश असून कोरोनाची व्यापकता कमी आहे. भारतात कोरोनाचा सामुदायिक प्रसार झाला नाही. भारतात प्रति एक लाख रुग्णांमागे मृत्यू झालेल्यांची संख्याही खूप कमी आहे. 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 0.73 टक्के लोकांना कोरोनचा दुसऱ्यांदा संसर्ग झाला. लॉकडाऊनच्या उपायांमुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यास अटकाव झाला, असे भार्गव म्हणाले.