कोईम्बतूर - तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये काल (शुक्रवार) दिवंगत सामाजिक कार्यकर्ते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेनंतर लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेची निंदा केली. ‘महान व्यक्तीला तिरस्कार विद्रुप करु शकणार नाही’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
पेरियार हे 19 व्या शतकातील समाजसुधारक होते. त्यांनी स्वाभिमान आणि द्रविड कळघम या चळवळी सुरू केल्या होत्या. त्यांना द्रविड चळवळीचे पिता संबोधले जाते. शुक्रवारी काईम्बतूरमधील सुंदरपूरम येथील त्यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी केशरी रंग टाकला. या घटनेनंतर स्थानिक, द्रविड विचारसरणीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दोषींना अटक करण्यासाठी सर्वांनी आंदोलन केले.
द्रविडियन कळघम संघटनेकडून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटकांनी पेरियार यांच्या पुतळ्यावर केशरी रंग टाकला. त्यानंतर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस आणि पेरियार समर्थकांनी पुतळ्यावरील रंग साफ केला असून तेथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एमडीएमके पक्षाचे नेते वायको यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली आहे. पेरियार यांचा पुतळा फक्त पुतळा नसून सामाजिक न्यायाचा मार्ग आहे, असे वायको यांनी ट्विट केले आहे. सरकारने दोषींवर तत्काळ कारावाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनीही केली आहे.