श्रीनगर - दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ श्राईन बोर्डाने (एसएएसबी) यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज (मंगळवार) बैठक बोलावली होती. त्यामध्ये ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. यामध्ये जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जी. सी. मुर्मू यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी एसएएसबीच्या सदस्यांशी संवाद साधला. जम्मू काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
अमरनाथ यात्रेला दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच देशभरातून याठिकाणी लोक येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, एसएएसबीने आज यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी, १३ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले होते, की अमरनाथच्या गुहेचे थेट प्रक्षेपण देशभरात दाखवत, भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी. यासाठी दूरचित्रवाणी आणि इंटरनेटची मदत घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यात्रा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यामुळे ही यात्रा होणार की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. तसेच, २० जुलैनंतर यात्रेचे आयोजन केले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही यात्रा रद्द झाल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील वर्षी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या निर्णयामुळे प्रदेशात अशांतता होती. त्यामुळे अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्यात आला होता.
हेही वाचा : लडाख सेक्टरमध्ये नौदलाची मिग 29- के लढाऊ विमाने करणार टेहाळणी