लखनौ - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. राजकारणाची हवेचा अंदाज घेऊन एकत्र आलेल्या बसप, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांच्या महाआघाडीला आता खिळ बसण्याची शक्यता आहे. या आघाडीतील निषाद पक्ष नाराज असून भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणाला आता वेगळेच वळन आले आहे .
उत्तर प्रदेशामध्ये भाजप विरोधात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली होती. त्यानंतर त्या आघाडीमध्ये राष्ट्रीय लोक दल सामिल झाले. तर अवघ्या ३ दिवसांपूर्वी निषाद पक्षानेही आघाडीचा हात पकडला होता. मात्र, हाच निषाद पक्ष आता आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत दिसत आहे.
निषाद पक्षाचे सर्वेसर्वा संजय निशाद यांनी शुक्रवारी आपण आघाडीमध्ये राहणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे पक्के झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे गणितं बदलण्याची शक्यता आहे.
आपण आघाडी केली मात्र त्यांनी (आघाडीने) आपल्या पक्षाचे नाव कधीच घेतले नाही. त्यामुळे आपण आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे संजय निषाद यांचे म्हणणे आहे. तसेच समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, त्यामध्ये आपल्याला उमेदवारी दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
समाजवादी पक्षाने आज पुन्हा दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये त्यांनी रामभुआल निषाद यांना गोरखपूर येथून उमेदवारी दिली आहे. रामभुआल निषाद हे संजय निषाद यांचे पुत्र आहेत.