जयपूर - सध्या कोरोना विषाणुमुळे संचारबंदी लागू आहे. राजस्थानमधील जयपूर येथील कटेंनमेंट झोनंमधील महिलांना सॅनिटरी पॅड्स देण्याचे काम कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस करत आहेत. महिलांच्या या समुहाला 'निर्भया स्कॉड' असे नाव देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील काही भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
निर्भया स्कॉडने जयपूर पॅडमॅनसोबत मिळून या कामाला सुरुवात केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असतात. यामुळे महिलांना सॅनिटरी पॅड्सची गरज पडू शकते, हे ओळखून या महिलांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत निर्भया स्कॉडने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये जवळपास ३ हजार सॅनिटरी पॅड्सची पाकिटे वाटली आहेत.
शहरातील महिलांना त्रास देण्याऱ्यांपासून वाचवण्यासाठी गेल्यावर्षी निर्भया स्कॉडची स्थापना केली होती. शाळा, कॉलेज, मॉल्स, बस स्थानके आदी परिसरात महिलांना धमकी दिली जात असे. याला आळा घालण्यासाठी मार्शल आर्ट्स शिकलेल्या महिला पोलिसांनी निर्भया स्कॉडची स्थापना केली. यामध्ये ८० महिला कॉन्स्टेबल्स आहेत. कर्फ्यू लागू असलेल्या परिसरात या महिला पोलिसांंनी फ्लॅग मार्च काढला. या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगसह अनेक संदेश देण्यात आले.
संचारबंदीमध्ये वस्तू मिळणे कठीण असते. कर्फ्यू लावलेल्या परिसरात आम्हाला जाणे शक्य नव्हते. सॅनिटरी पॅड्स पोहोचवणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही महिला पोलिसांच्या निर्भया स्कॉडची मदत घेतली, असे जयपूर पॅडमॅन समुहाचे सदस्य आशिष पराशर यांनी सांगितले. घरातील महिलांसाठी पुरुष सॅनिटरी पॅड्स आणत नाहीत. यामुळे आम्ही निर्भया स्कॉडची मदत घेऊन हे काम सुरू केले, असेही ते म्हणाले.
राजस्थानाता आतापर्यंत कोरोनामुळे ९५ लोकांचा मृत्यू झाला असून ३ हजार ४०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जयपूरमधील काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या २२ मार्चपासून संपूर्ण राजस्थानात लॉकडाऊन लागू आहे.