नवी दिल्ली - अखेर निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आले. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजाडला. दोषींची फाशी टळावी यासाठी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न झाले. मात्र, सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावत फाशीचा निर्णय कायम ठेवला. आरोपींना फाशी देण्यापूर्वी अर्धा तास नेमके काय घडले...
आज पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी चारही आरोपींना उठवण्यात आले. पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते. यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांचे हात बांधण्यात आले. फाशी घरात घेवून जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लोळू लागला. त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्या वेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही आरोपींच्या गळ्याभोवती फास आवळला.
तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते.