रायपूर - छत्तीसगमधील वन्य प्राणी अभयारण्यात एका जंगली बैलाची(बायसन) हत्या केल्याच्या आरोपाखाली 9 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना कबिरधाम जिल्ह्यातील भोरामदेव वन्यप्राणी अभयारण्यात घडली. वन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विद्युत प्रवाह सोडून जंगली बैलाची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. 29 जुलैला चिलफी फॉरेस्ट रेंजमध्ये नंदिनी टोला गावाजवळ मृतावस्थेत बैल आढळून आला होता. हे ठिकाण राजधानी रायपूर पासून 140 कि.मी दुर आहे. प्राण्यांची तस्करी करण्यासाठी त्यांना विद्युत प्रवाहाद्वारे मारण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
वन अधिकाऱ्यांनी तस्करांना पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. या प्रकरणी आता 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व जण जिल्ह्यातील नंदिनी आणि कुमान या गावातील आहेत. त्यांना 4 ऑगस्टला ताब्यात घेण्यात आले आहे. जंगलातील छोट्या प्राण्यांना मांस मिळवण्यासाठी विद्यूत प्रवाह देऊन मारत असल्याचे सर्वांनी मान्य केले आहे. मात्र, चुकून जंगली बैल या जाळ्यात सापडल्याने मृत्यू झाला, असे आरोपींनी सांगितले. वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत सर्वांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.