मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पातून देशातील तरुणांना रोजगार आणि उद्योगांसाठी मोठी संधी मिळणार असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ शिक्षणतज्ञ निनाद करपे यांनी केले. या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप यावर भर दिला असल्याने तरुणांमध्ये असलेल्या रोजगार आणि इतर विषयाचा प्रश्न या माध्यमातून सुटेल असेही करपे म्हणाले.
या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षणातील गुणवत्तेसाठी मोठा भर देण्यात आला आहे. विशेषत: शिक्षणाची गुणवत्ता देणाऱ्या महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना २०० कोटींची भरीव तरतूद यात करण्यात आल्याने त्याचा एक चांगला लाभ शिक्षण संस्थांना होणार आहे. त्यामुळे चांगले शिक्षण मिळण्याची संधी ही या अर्थसंकल्पामुळे देशातील तरुणांना मिळणार आहे.
पहिल्यांदाच सरकारने कौशल्य विकासाच्या माध्यमातून बांबू आदी उद्योगांवर भर दिला आहे. तसेच तंत्रशिक्षणच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी आदी शिक्षणावर सरकार मदत करणार असल्याने त्या क्षेत्रात तरुणांना अधिक चांगले शिक्षण मिळण्याची ही संधी यातून निर्माण होणार आहे. विशेषत: आजपर्यंत देशात पदवीधर आणि पदव्युत्तर असतानाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत नव्हता. त्याला प्रमुख कारण होते कौशल्य विकासाचे. त्यामुळे एक मोठा गॅप यातून पडला होता. मात्र, आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून तो भरून काढला जाणार आहे. स्टार्टअपवर सरकारने अधिक भर दिल्याने याचा लाभ देशातील तरुणाला होईल अशी माहितीही निनाद करपे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.