श्रीनगर - ताबारेषेवरील 'ट्रेड प्रकरण' समोर आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गतीने चक्र फिरवत काश्मीर खोऱ्यात विविध सहा ठिकाणी छापे मारले आहेत. गुरुवारी (24 सप्टेंबर) रोजी करण्यात आलेल्या कारवाईत या प्रकरणाशी निगडीत धागेदोरे सापडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष ताबारेषेवरील अवैध वाहतुकीला तसेच घुसखोरीला लगाम लावण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने काश्मीर खोऱ्यातील विविध भागांत छापे मारले.
छापेमारीदरम्यान, काश्मीरच्या वसाहती परिसराची तपासणी करण्यात आली. यावेळी महम्मद इक्बाल रेसिडेन्स आणि खुर्शीद अहमद भागात शोधमोहिम राबवण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सीमारेषेपलिकडील विविध अवैध मार्गांसंबंधी माहिती गोळा केली. या मार्गांमार्फत अवैध वाहतुक केली जाते. तसेच या ठिकाणी संशयित व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांमध्ये नार्कोटिक्स विभागाने कारवाई केलेल्या पीर अर्शिद इक्बाल आलीयास अशू या व्यापाऱयाचा समावेश आहे. त्याच्यावर याआधी नार्कोटिक्स विभागाने कारवाई केली होती. तो बारामुल्लाचा रहिवासी आहे. पीर अर्शिद जम्मूतील कठुआ कारागृहात आहे.
याचसोबत एनआयएने हुरियतचा नेता बशीर अहमद सोफी याची परिसरही सील केला होता. यामध्ये त्याच्या मालकीचे आशा ट्रेडर्स हे दुकान देखील होते. तो बारामुल्लाचा रहिवासी आहे.
या कारवाईदरम्यान एनआयएमार्फत महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल डेटा हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.