नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून चीन आणि नेपाळसोबत भारताचा सीमावाद चिघळला आहे. नेपाळने कालापानी जवळील चांग्रु येथे आपल्या सीमा चौकीत (बीओपी) सुधारणा करत संबधित चौकी कायमस्वरुपी बनविली आहे. जिथे सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतील. याबाबत एका अधिकाऱ्याने गुरुवारी माहिती दिली.
यापूर्वी ही चौकी हिवाळ्याच्या हंगामात दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात बंद असते. चांग्रु नेपाळच्या धारचुला जिल्ह्यात आहे. नेपाळी लष्करप्रमुख पूर्णचंद्र थापा यांनी बुधवारी प्रगत सीमा चौकीची पाहणी केली. धारचुलाचे उपजिल्हाधिकारी ए.के. शुक्ला यांनी गुरुवारी यांना याबाबत माहिती दिली. चौकीला कायमस्वरुपी करण्यात आले असून आता हिवाळ्यातही बंद होणार नाही.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना आज नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयकावर मतदान होणार आहे. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे. नेपाळचा सध्या भारताबरोबर सीमावाद सुरू आहे.