नवी दिल्ली - भारत-नेपाळ सीमेवरील बिहारच्या जोगबनी शहरातून नेपाळकडे जाणाऱया ट्रकमधून भारतीय चलन नोटांमध्ये 1.9 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने मंगळवारी ही कारवाई केली.
पोलिसांनी ट्रक चालकासह एकाला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर व्यवहार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर नेपाळ पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आले होते. माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी सर्व वाहनांचा बारकाईने शोध सुरू केला होता.