नवी दिल्ली - नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने 670 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एकास मुंबईतून अटक केली आहे.
अमली पदार्थाचे एक पार्सल दिल्लीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाला 1 सप्टेंबरला मिळाली होती. माहिती मिळताच एनसीबीने हालचाली करत कोकेन जप्त केले. दिल्लीतून हे पार्सल मुंबईला पाठविण्यात येणार होते. पथकाने ते पार्सल ताब्यात घेत त्याचप्रकारचे दुसरे पार्सल तयार करुन मुंबईला पाठवले. ताब्यात घेतलेल्या पार्सलमधून 670 ग्रॅम वजनाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 4 कोटी रुपये किंमत असलेला कोकेन नामक अमली पदार्थ जप्त केला.
त्यानंतर एनसीबीचे पथक डमी पार्सलसह मुंबईत पोहोचले. डमी पार्सल घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला तत्काळ एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. संशयितास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताची चौकशी सुरू असून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तैयारी नही थी', थरूर यांची कवितेद्वारे मोदींवर टीका