नवी दिल्ली - माझी बायको कधीच खोटे बोलत नाही, असे म्हणत नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीची पाठराखण केली. सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी अमृतसरमधून लोकसभेचे तिकीट न दिल्यामुळे काँग्रेस नेत्यांवर आरोप केला होता. याप्रकरणी सिद्धू यांनी पत्नीचे समर्थन केले आहे.
मी पक्षाकडे अमृतसर आणि चंदीगड लोकसभा जागेसाठी मागणी केली होती. मात्र, माझ्या मागणीकडे पक्षाने दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आशा कुमारी यांनी अमृतसरमधून मी निवडून येऊ शकत नाही, असे सांगितल्यामुळेच माझे तिकीट नाकारले गेले, असा आरोप कौर यांनी केला होता.
काय आहे प्रकरण
अनेक दिवसांपासून कौर या चंदिगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. या मतदार संघातून आपल्या काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, त्यांच्याऐवजी या मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पवन बन्सल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कौर या पक्षावर नाराज झाल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आशा कुमारी यांच्यावर आरोप केले, असे बोलले जात आहे.