नवी दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री आणि गांधी परिवाराशी जवळचे संबंध असलेल्या नटवर सिंह यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या वयस्कर लोक पक्षात प्राण ओतू शकणार नाहीत, असे ते म्हणाले. तसेच, 'राहुल गांधींमध्ये काय समस्या आहे, हे माहीत नाही आणि त्याविषयी बोलू इच्छित नाही,' असेही ते म्हणाले. ईटीव्ही भारतने सिंह यांची विशेष मुलाखत घेतली. त्या वेळी, त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी चिंता व्यक्त केली.
'राहुल गांधींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. त्यांनी तोलून-मापून जबाबदारीने बोलले पाहिजे. असे न केल्यामुळेच पाकिस्तानला राहुल यांच्या वक्तव्याचा वापर करून घेण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने राहुल गांधींचे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांमध्ये वापरले,' असे नटवर सिंह यांनी म्हटले आहे.
प्रमुख मुद्दे
- या क्षणी देशात एकच नेता आहे आणि त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे.
- देशातील लोकांचा गांधी परिवारावरील विश्वास आधीच्या तुलनेत खूपच घटला आहे. विशेषतः मागील पाच वर्षांत असे जास्त प्रमाणात घडले आहे.
- राहुल यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना माझ्या कुटुंबातील कोणीही अध्यक्ष बनणार नाही असे म्हटले होते. मात्र, पक्षाने पुन्हा सोनिया गांधींकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली. कोणत्याही तरुण नेत्याला संधी देण्यात आली नाही.
- सोनिया गांधी प्रियांकांना का पुढे आणत नाहीत, हा मोठा पेच आहे.
- 1995 ची पिढी काँग्रेस परिवाराला फारसे मानत नाही.
- चिदंबरम यांच्यानंतर आता कुणाचा नंबर लागेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मोदींनी आधीच स्पष्ट केले होते की, ही तर फक्त सुरुवात आहे.
- चिदंबरम यांच्याविरोधात मोदींनी जी पावले उचलली आहेत, ती अत्यंत विचारपूर्वक उचलली असण्याची शक्यता आहे.
- मोदी सूड उगवण्याच्या उद्देशातून हा कारवाई करताहेत, असे वाटत नाही. त्यांच्याजवळ 303 खासदार आहेत. त्यांना असे काही करण्याची गरज नाही.
- भारताला काँग्रेस पक्षाची गरज आहे. आता पक्षात पुन्हा कसा जिवंतपणा आणायचा, ही समस्या आहे.
- 18 वर्षे सोनिया गांधींनी पक्षावर नियंत्रण ठेवले. त्यांची पकड हळूहळू कमजोर झाली. सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणणे ही पक्षातील ज्येष्ठांच्या अवाक्यातली गोष्ट नाही.
- झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणा... कोठेही काँग्रेसच्या जिंकण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. असे झाले तर, पक्षाची स्थिती आणखी खराब होणार यात शंका नाही.