मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तपासात अनेक बड्या सिनेतारकांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, सेलिब्रिटींना तपासासाठी बोलविण्यात आल्यानंतर अनेक माध्यमांच्या वाहनांकडून त्यांचा पाठलाग करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. घरातून निघाल्यापासून ते सरकारी कार्यालयात पोहचेपर्यंतची प्रत्येक हालचाल दाखविण्यासाठी माध्यमांमध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. अशा 'पापाराझ्झी' माध्यम प्रतिनिधींविरोधात कारावाई करण्याची ताकीद मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील झोन एकचे पोलीस उपायुक्त संग्राम सिंग निशंदर यांनी अधिकृत वक्तव्य जारी करत माध्यमांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. 'अंमली पदार्थ विरोधा कार्यालयाने चौकशीसाठी बोलाविलेल्या अनेक सेलिब्रेटींच्या वाहनाचा माध्यमे पाठलाग करताना दिसून आले आहे.
शनिवारी दुपारी काही माध्यम प्रतिनिधींना मागील आणि पुढच्या बाजूला वाहनांचा पाठलाग करताना आम्ही पाहिले. आम्ही हे सहन करणार नाही. यापुढे कोणत्याही वाहनांचा पाठलाग करण्यापासून प्रसारमाध्यमे यांना त्यांनी चेतावणी दिली. मात्र, जर कोणी त्याचे उल्लंघन करत असल्याचे आढळले तर त्यांनी वाहने ताब्यात घेऊन त्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही निशंदर म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणांच्या तपासानंतर काही माध्यम कर्मचाऱ्यांनी चित्रपट कलाकारांचा पाठलाग केला. त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासारख्या सेलेब्सचा समावेश होता.