मुंबई - दत्तक घेतलेल्या मुलांची २ ते ४ लाख रुपयांना विक्री करण्यात येत होती. लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीमार्फत हे कार्य चालत होते. मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करताना ४ महिलांसह ५ जणांना अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी माहिती देताना सांगितले, की पोलिसांनी लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या पोलिसांनी मानखूर्द येथील साठे नगरमध्ये एका घरावर छापा टाकला. यावेळी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साठे नगर भागातील अजून २ महिलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी ४ महिलांसह एकूण ५ जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
बाळांची 'अशी' व्हायची विक्री
लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीतील महिला बाळाला जन्म दिलेल्या गरीब महिलांशी संपर्क साधत होत्या. बाळाला दत्तक देतो, असे महिला बाळाच्या आईला सांगायच्या. बाळाला ताब्यात घेतल्यानंतर महिला दत्तक घेणाऱ्याकडून २ ते ४ लाख रुपये घेत होत्या.