गोंदिया - जिल्ह्याचा रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर, गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशमध्ये समाविष्ट करावे, असे सूचक विधान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले. गोंदिया येथे डीबी सायन्स महाविद्यालयात आज मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय व पदवीत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या पदक वितरण कार्यक्रमाला सिने अभिनेते संजय दत्त, प्रसिद्ध उद्योगपत्ती अनिल अग्रवाल आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील डांगुरली हे गाव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आहे. शिवाय या गावाजवळून वैनगंगा व बाघ नदी वाहते. त्यामुळे हा ठिकाणी बॅरेजच्या माध्यमातून पाणी अडवता येणे शक्य आहे. त्यामुळे सीमावर्ती भाग सिंचनाखाली येऊ शकतो. यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काही ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणातून केली.
पटेल यांच्या मागणीवर उत्तर देताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशला जोडल्यानंतर हा प्रश्न सुटू शकतो, असे सागंत गोदिंया जिल्हा मध्यप्रदेशमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतचे सूचक विधान केले.
प्रफुल्ल पटेलांनी मागितला तर जीवही देईन - संजय दत्त
महाविद्यालय पटांगणात आयोजित या कार्यक्रमात अभिनेता संजय दत्त यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. संजय दत्त यांनीही यावेळी फिल्मी डायलॉगबाजी करत श्रोत्यांची मने जिंकली. संजय दत्त म्हणाला, की माझ्या वाईट काळात प्रफुल पटेल यांनी खुप मदत केली आहे, मी त्यांचा ऋणी आहे. त्यामुळे प्रफुल्ल भाईंनी माझा जीव जरी मागितला तरी मी तो देईन, अशा शब्दात संजय दत्त यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच लोणावळा- खंडाळा व मुबंईमध्ये जसे फिल्म सिटी आहे, तशी फिल्म इंडस्ट्री गोंदिया जिल्ह्यातही निर्माण व्हावी, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.